Read about plastic Waste Management in
चिपळूण मधील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
आपल्या घरातील संबंधीत भाज्यांची देठे, फळांच्या साली, उरलेले अन्न यासारख्या ओल्या कच-यापासून ते दैनंदिन वापरातील प्लास्टिकच्या पिशव्या व इतर वस्तू, कागद, कापड, काच, पत्रा यासारख्या वस्तूंच्या बदलत्या जीवनशैलीनुसार अनिवार्य व वाढत्या वापरामुळे दररोज प्रचंड प्रमाणात निर्माण होणा-या कच-याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हे जगासमोरचे मोठे आव्हान आहे. या कच-यामध्ये विशेषत: औदयोगिकीकरणातून निर्माण होणारा रासायनिक द्रवरुपी व वायूरुपातील कचरा, तसेच रेडीओ, टी व्ही., फ्रीज, मोबाईल यासारख्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या ई-कच-याची भर पडल्यामुळे कच-याचे स्वरुप अत्यंत घातक बनत चालले आहे. संपूर्ण जगामध्ये कच-याच्या व्यवस्थापनाची समस्या फारच गुंतागुंतीची व गंभीर बनत चालली आहे. आपले शहर परिसरात तसेच खेडेगावातही ठीकठीकाणी कच-याचे ढिगारे आढळून येतात. त्याचबरोबर कचरा खाणारी जनावरे, कुत्रे, डुकरे नेहमीच दिसतात. जाळीमध्ये अडकून मृतावस्थेत पडलेली सागरी कासवे, मासे इत्यादी प्राणी नेहमीच समुद्रकिना-यावर आढळतात. कच-याची प्रचंड निर्मिती व त्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन न झाल्याने त्यापासून होणाऱ्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या तसेच हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन अनेक प्रकारे पर्यावरणाचा ह्रास होत आहे. या प्रश्नासंबंधात जनजागृती करण्याबरोबर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यासाठी संस्थेतर्फे गेल्या वर्षीपासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन चिपळूण नगर परिषदेचे सहकार्याने करण्यात येत आहे.
जनजागृती
चिपळूण शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सर्व प्रकारच्या विघटन होणाऱ्या, वर्षानुवर्षे अविघटीत राहणा-या तसेच विषारी गुणधर्माच्या कच-याविषयी माहिती सांगून त्याच्या व्यवस्थापनेच्या कामामध्ये प्रत्येक नागरीकाचा सहभाग लाभावा, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. आपल्या छोटया कृतीतून कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी आपण काय करू शकतो यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी या परिसरात व्याख्याने, फिल्म शो, पत्रके वाटणे, माहिती फलक लावणे, महिला बचत गटांच्या बैठका, सदनिकांमधील रहिवाशांच्या बैठका याव्दारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्यक्ष कचरा व्यवस्थापन
कचरा समस्येसंबंधी जनजागृती करण्यापुरते मर्यादित न राहता या मोहिमेला कृतीची जोड देण्याची आवश्यकता लक्षात घेवून चिपळूण शहरातील "किरण विहार संकुल" या ६९ सदनिकांच्या इमारतीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला. या संकुलामधील प्रत्येक सदनिकेमधील ओला कचरा रोजच्या रोज जमा करण्यात आला व संकुलाचे आवारात तयार करण्यात आलेल्या टाक्यांमध्ये ओला कचरा टाकून त्यापासून खत निर्मितीचे काम सुरु करण्यात आले. तसेच संकुलातील सुक्या कच-याचे वर्गीकरण म्हणजे त्यामधील प्लास्टिक, काच, कापड, कागद इत्यादीं प्रकारांत करून तेथेच जमा करण्यात आला. कच-याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणाऱ्या कारखान्यांकडे तसेच संबंधीत व्यापा-यांकडे वर्गीकरण करण्यात आलेला कचरा पाठविण्यात आला. सुरुवातीला ३ महिन्यांपर्यंत सदर प्रकल्प संस्थेतर्फे चालविण्यात आला व नंतर किरण विहार संकुलाकडे हस्तांतरीत करण्यात आला असून तो उत्तमरितीने सुरु आहे. चिपळूण शहरातील या नाविन्यपूर्ण व प्रथमच राबविलेल्या प्रकल्पासाठी प्रोत्साहन म्हणून चिपळूण नगर परिषदेने संकुलातील सर्व सदनिकाधारकांना त्यांच्या घरपट्टीमध्ये ५ टक्के सूट दिली आहे. आपल्या संकुलामधील संपूर्ण कच-याचे व्यवस्थापन स्वत:च करण्यासंबंधीचा चिपळूण शहरातील पहिलावहिला प्रकल्प अशा त-हेने यशस्वी झाला.
संपूर्ण चिपळूण शहर तसेच लगतच्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन कामाचा प्रारंभ:
सोसायटी कम्पोस्टिंग
आपल्या गृह संकुलातील सर्व प्रकारच्या कच-याचे व्यवस्थापन स्वत: त्या संकुलानेच करावयाचे अशा प्रकारचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर असाच प्रकल्प चिपळूण शहरात अन्य संकुलांमध्ये सुरु करण्यासाठी डाउ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लि. व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने अधिक विस्तारीत स्वरुपातील काम यावर्षी सन २०२१ मध्ये संस्थेतर्फे सुरु करण्यात आले. चिपळूण शहरातील ‘स्वर विहार संकुल’ या १५६ सदनिकांच्या इमारतीमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम गतवर्षीच्या ‘किरण विहार संकुल’ प्रमाणे सुरु करण्यात आले. या संकुलातील कचरा व्यवस्थापन कामासाठी येणा-या खर्चातील अधिकांश भाग डाउ केमिकल इंटरनॅशनलने उचलला आहे. शहरातील इतर संकुलांमध्येही अशा स्वरुपाचे काम सुरु करण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत व त्याला यशही लाभत आहे.
वैयक्तिक कम्पोस्टिंग
गृह संकुलांतील ओल्या कच-यासाठी एकत्रीतपणे खत प्रकल्प सुरु करत असताना ज्या नागरीकांची स्वतंत्र घरे आहेत त्यांना घरातील ओल्या कच-यापासून खत तयार करण्यासाठीचा ड्रम तयार करुन नाममात्र किंमतीत पुरविण्यात आला व आतापर्यंत १०० च्या वर घरांमध्ये ओल्या कच-यापासून खत निर्मिती सुरु झाली आहे. वैयक्तिक खतनिर्मितीसाठी च्या ड्रमच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्लास्टिकचा वापर अनिवार्य आहे ही वस्तुस्थिती आहे. प्लास्टिक नैसर्गिकरित्या विघटीत होत नसल्याने शेकडो वर्षांपर्यत ते जमिनीतच राहते व त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो तसेच प्लास्टिक कचरातून विषारी द्रव्य पाझरुन जमिनीत मुरतात व जमीन प्रदूषीत होते. टाकलेले प्लास्टिक नदी/ नाल्यांमध्ये साचते त्यामुळे अनेक प्राण्यांच्या मृत्यूला, पूर परिस्थितीला आपणांस सामोरे जावे लागते. नागरीकांनी प्लास्टिकचा कमीतकमी वापर करावा, ते पुन्हा पुन्हा वापरावे व वापरल्यास ते कच-यात न टाकता रिसायकलींगसाठी दयावे यासाठी संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम, व त्याचबरोबर नागरिकांकडून त्यांचे घर/व्यवसायाचे ठिकाणाहून प्लास्टिक जमा करावयास सुरुवात करण्यात आली.
दुधपिशवी संकलन
शहरातील हॉटेल्स, चहाचे स्टॉल यांचेकडे जमणा-या दूधाच्या पिशव्या दररोज घेतल्या जातात व रोजच्या रोज रिसायकलींग साठी देण्यात येतात. या पिशव्या सदरच्या व्यावसायिकांकडून उत्स्फुर्तपणे देण्यात येतात. साधारणपणे ५५ ठीकाणांहून सरासरी १० किलो दूधाच्या पिशव्या जानेवारी २०२१ पासून दररोज रिसायकलींगसाठी देण्यात येत आहेत.
प्लास्टिक भीशी
या अभीनव उपक्रमामध्ये चिपळूण शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील १६ खेडेगावातील नागरीक, व्यापारी, विद्यार्थी, महिला बचत गट यांच्याकडून सर्व प्रकारचे प्लास्टिक विकत घेतले जाते व त्यांना प्रत्येकी १ किलो प्लास्टिकसाठी कुपन दिले जाते. जमविलेल्या कुपनांमधून महिन्यातून एकदा भीशीच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढला जातो व विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. या भिशीमध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिकचे संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या संकलन केंद्रामध्ये वर्गीकरण करण्यात येऊन योग्यप्रकारे रिसायकलींग करणा-या कंपनीकडे प्लास्टिक देण्यात येते. या उपक्रमासाठी सर्व स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
माझा शाश्वत कोपरा
डाउ केमिकल इंटरनॅशनल इंडिया चे कंट्री प्रेसिडेंट आणि सी.ई.ओ. श्री. चंद्रकांत नायक यांच्या मौलीक मार्गदर्शनाखाली ग्रामीण विभागातील १५ शाळांमध्ये माझा शाश्वत कोपरा ह्या पर्यावरण विषयक जागृतीसंदर्भातील अभीनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या मनामध्ये पर्यावरण संवर्धन विषयक जागृत, डोळस दृष्टीकोन सतत बाळगावयाचा म्हणजेच एक शाश्वत कोपरा निर्माण करावयाचा, व त्या विचाराला दैनंदिन शालेय अभ्यासक्रमाबरोबर स्वच्छ व निरोगी पर्यावरण विषयक कृतीची म्हणजे कचरा व्यवस्थापन, हवा, पाणी, जमिन इत्यादी पर्यावरणीय घटकांच्या संवर्धन विषयक कृतीची जोड दयावयाची व शाळेतही शाश्वत कोप-याची निर्मिती करावयाची, अशा स्वरुपाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्लास्टिक कच-याच्या दुष्परीणामांबाबत शाळेमध्ये माहिती देण्यात आली व पहिला उपक्रम म्हणून वरील १५ शाळेतील ३९१३ मुलांनी आपले घरात निर्माण होणारे प्लास्टिक जमवून शाळेत आणून दयावयाचे, असे ठरविण्यात आले. प्रत्येक महिन्याला संस्थेतर्फे मुलांकडून हे प्लास्टिक विकत घेतले जाईल तसेच मुलांना प्रोत्साहनपर भेट वस्तू तसेच बक्षीसे देण्यात येतील, व जमा करण्यात आलेले सर्व प्लास्टिक रिसायकलींगसाठी देण्यात येईल. या उपक्रमामुळे गावामध्ये घरोघरी जाळण्यात येणा-या प्लास्टिकचे प्रमाण कमी होईल व त्याबरोबरच गावातील जमिनीत अथवा नदी-नाल्यांत टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकला आळा बसेल व प्रदूषण टळेल.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
कचरा व्यवस्थापनाचे काम हे मुख्यत्वेकरुन वैयक्तिक पातळीवरुन सुरु होणे गरजेचे असून संस्थेतर्फे आयोजित विविध उपक्रमांमध्ये शहरातील व ग्रामीण भागातील नागरीक, व्यापारी, शाळा व्यवस्थापन, व विदयार्थी वर्ग, महिला बचत गट अशा सर्वांचा मोलाचा व वाढता सहभाग लाभत आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी डाउ केमिकल इंटरनॅशनल इंडिया चे प्लांट मॅनेजर आणि डायरेक्टर इंडिया ऑपरेशन्स श्री. सुभाष मुकादम, जिओग्राफिक कम्युनिकेशन्स मॅनेजर श्री. अजय नायर, मॅनेजर क्वालिटी श्री. दिपक म्हात्रे व कोऑर्डीनेटर एच. आर., ॲडमिन ॲन्ड आय. आर. श्री. विनायक वैद्य या सर्वांचे तसेच इतर अधिकारी वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. त्याचबरोबर त्यांचे कर्मचारीसुद्धा विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात.