करोना व्हायरस मुळे कासव महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
आंजर्ले (ता. दापोली) येथे कासव संरक्षण मोहीम उत्तम प्रकारे चालू आहे. ग्रामपंचायत आंजर्ले, कासव मित्र मंडळ, आंजर्ले यांच्या वतीने व वनविभाग रत्नागिरी व सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
तेथे पर्यटकांना कासवाची नवजात पिल्ले समुद्रात जाताना पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. राहण्यासाठी होमस्टेची व्यवस्था केली होती.
महोत्सवादरम्यान सकाळी ७ व संध्याकाळी ६ वाजता कासवे समुद्रात सोडण्यात आली. कासवांसबंधित माहिती देण्य़ासाठी तिथे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांतर्फे पर्यटकांना कासवांबरोबरच कोकणातील निसर्गाची ओळख व्हावी यासाठी कांदळवनाची निसर्गभ्रमंती व पक्षांची माहिती देण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. तृशांत भाटकर - 9404 765 477 / 7038 425 793 This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
श्री. अभिनय केळस्कर - 9637 654 327 / 9404 765 675 This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
श्री. मोहन उपाध्ये - 8975 622 778 This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
जगभर सागरी कासवे धोक्यात आली आहेत. त्यांची संख्या दर वर्षी कमी होत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी, प्रदूषण, मांसासाठी कासवांची हत्या, कासवांच्या अंड्याची चोरी या सारख्या विविध गोष्टींमुळे कासवांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. कासवांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या जाणीवेतून आंजर्ला गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने समुद्र किना-यावर कासवांची घरटी संरक्षित केलेली आहेत. दापोली तालुक्यात असलेले आंजर्ला हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. भरपूर निसर्गसंपन्नता असलेले हे गाव आहे.
सागरी कासवे रात्रीच्यावेळी बाहेर पडतात. किना-यावरील वाळूत मागच्य़ापायानी खड्डा करतात व त्यात १०० ते १५० अंडी घालतात खड्डा बुजवतात व समुद्राकडे परत जातात. ही अंडी नैसर्गिक उष्णतेने उबून ४५ ते ५५ दिवसात पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ४-५ दिवसांनी वाळूतून बाहेर पडून ती आपोआप समुद्राकडे जायला लागतात. अंडी घालून कासवे परत गेल्यावर कधीही आपल्या घरट्या कडे परत येत नाहीत. वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा मागोवा काढून काही लोक त्यांच्या घरट्याचा शोध घेउन अंड्यांची चोरी करत. स्थानिक, वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र ह्यांनी केलेल्या जन जागृतीमुळे याप्रकाराला आळा बसला आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम १४ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ह्या कामातून १,००० हून अधिक घरटी संरक्षित करण्यात येऊन ४० हजार पेक्षा पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. समुद्रात गेलेली पिल्ले मोठी होऊन त्याच किनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत येतात. जवळपास १,००० पिल्लांमधून केवळ १ पिल्लू वाचून मोठे होते. शिवाय समुद्रमार्गे येणारे प्लास्टिक आणि इतर कचरा कासवांना घरटे करण्यास अडथळा निर्माण करतो. अशा कचऱ्यामुळे मादी कासवांना सुरक्षित जागा न मिळाल्याने घरटे न करताच ती परत गेल्याच्या घटनांची नोंद आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता स्थानिक पातळीवर होत असलेले कासव संवर्धनाचे काम किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
हे सर्व लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कासवांची घरटी संरक्षित केलेली आहेत तसेच आंजर्ल्यातील सर्व शाळा एकत्रित येऊन किनारा स्वच्छता मोहिम देखील राबवत असतात. आंजर्ला कासव महोत्सावात जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी होऊन ग्रामस्थांच्या कासव संवर्धन कार्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ग्रामपंचायती तर्फे करण्यात आले.