Print

सोमवार दि. २४ रोजी, चिपळूण मधील रश्मी पॅलेस, मार्कंडी येथील श्रीमती इंदिरा कृष्णाजी आपटे यांचे रहात्या घरी वृध्दापकाळा मुळे ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलींनी सौ. प्रज्ञा मोने व सौ. रश्मी जोशी  यांनी सामाजीक जाणीव जपत आईचे नेत्रदान करून एक आदर्श घडविला आहे. रात्री १० वाजता आईच्या मृत्यूनंतर लगेचच सह्याद्री निसर्ग मित्रचे कार्यकर्त्यांना कळवले. डॉ. ग.ल. जोशी यांनी त्यांच्या घरी जाऊन श्रीमती. इंदिरा कृष्णाजी आपटे यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढून सह्याद्री निसर्ग मित्रच्या कार्यकर्त्यांच्या हाती सुपुर्त केले. लगेचच कार्यकत्यांनी ते ’दृष्टीदान आय बॅंक’ सांगली येथे पोहचवले. 

सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण संस्थेच्या वतीने प्रथमच कोकणात नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत लोकांकडून मृत्युपश्चात नेत्रदानाची ८० संकल्प पत्रे आजपर्यंत भरून घेण्यात आली. नेत्रदान मोहीमेत चिपळूण मधील सर्व नेत्रतज्ञ, नॅब चे सर्व डॉक्टर सहभागी झाले असून सांगली येथील दृष्टीदान आयबॅंकेत डॉ. किल्लेदार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

गेले वर्षभर सह्याद्री निसर्ग मित्र चालवत असलेल्या नेत्रदान चळवळीत या दुस-या नेत्रदान मुळे चालना मिळाली आहे. जास्तीत जास्त लोकांनी संकल्पपत्र भरून देण्याचे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रचे श्री. भाऊ काटदरे व श्री. ऊदय पंडित यांनी केले आहे.