Print

 पत्नीच्या मृत्युपश्चात नेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श 

सुहास बारटक्के, चिपळूण  

pandit


केवळ सर्दीतापाचे निमित्त होऊन पत्नीचे अचानक निधन झाल्यास कोणताही सर्वसामान्य माणूस खचून जाईल; पण चिपळूण येथील सुहास पंडित यांनी आपली पत्नी वंदना यांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारले आणि त्यांचा नेत्रदानाचा संकल्प सिद्धीस नेला. या कृतीने इतरांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. वंदना पंडित लौकिकार्थाने जरी या जगात नसल्या, तरी त्यांचे डोळे हे जग पाहणार आहेत, हे समाधान पंडित कुटुंबाला खूप काही देऊन जाणारे आहे. 

चिपळूण येथील 'सह्याद्री निसर्ग मित्र' या मंडळाचे कार्यकर्ते सुहास पंडित यांची पत्नी वंदना पंडित यांचे अचानक निधन झाले. या धक्क्यातून सुहास सावरले आणि अवघ्या १५व्या मिनिटाला पत्नीची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपले थोरले बंधू उदय पंडित यांच्या मदतीने त्यांनी शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. ग. ल. जोशी यांच्याशी रात्री ११ वाजता संपर्क साधला आणि त्यांच्या सुचनेनुसार पत्नीचे पार्थिव हॉस्पिटलमध्ये आणले. डॉ. ग. ल. जोशी यांनी वंदना पंडित यांचे नेत्र (कॉर्निया) काढून ते आइस बॅगमध्ये ठेवून ते तातडीने अवयवदानासाठी सांगली येथील दृष्टीदान संस्थेकडे पाठवले. या संस्थेचे डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी दृष्टीदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या पेशंटच्या यादीमधील दोघांना पाचारण करून कॉर्नियाचे रोपण केले. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही वंदना पंडित यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. 

कासवांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी माहीत असलेल्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने अंधांसाठीही कार्य हाती घेतले आहे. मात्र, नेत्रदानाबद्दलची सजगता आणि तातडीने कॉर्निया काढून त्यांचे रोपण करणारी यंत्रणा या भागात अद्याप नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. मात्र, पंडित कुटुंबीयांच्या या आदर्शाने परिसरात याबाबत जागरुकता वाढीस लागेल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.