Print

 

www.netradaan.org

सह्याद्री निसर्ग मित्रने नेत्रदान चळवळ चालू केली आहे. सांगली येथील दृष्टीदान आय बॅंकेच्या सहकार्याने हे काम होत आहे. या नेत्रपेढीचे डॉ. कील्लेदार, नेत्र पेढीच्या पॅनलवरील डॉ. जोशी, डॉ. शारंगपाणी, डॉ. मुकादम, डॉ. सौ. वाघमारे तसेच ’नॅब’ चे डॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य या कार्यात होणार आहे. आपणही या कार्याला हातभार लाऊया.

दि. २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. त्या निमित खास लेख -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. भारतीय शास्त्रद्य्न श्री. हरमिंदर दुआ यानी अमेरीकेतील संशोधनात आपल्या डोळ्यातील काळ्या बुबुळाच्या ६ व्या पापुद्रयाचा प्रथमच शोध लावला. आज पर्यंत जगाला फक्त पाच पापुद्रे माहीत होते. या नवीन पापुद्रयाला त्याच संशोधकाच्या नावाने दुआज लेअर म्हणुन नोंदवण्यात आले. एका भारतीयाने डोळ्याच्या कॉर्नीयाबाबत केलेले संशोधन वाचुन अभीमान वाटला. त्यामुळे कॉर्नीया व नेत्रदानाबाबत अधीक माहीती वाचनात आली व त्यामुळे मात्र दु:ख वाटले.

जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तीपैकी २०% म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६०% मोती बिंदुमुळे तर २% कॉर्नीयाच्या खराब होण्यामुळे आहे. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजाराची भर पडत असते. या १,५६,००० अंधाना जर नेत्रदानापासुन कॉर्नीया 

उपलब्ध झाला तर त्याच्या जिवनातील अंधकार् दुर होऊ शकतो.

नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळयामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मीलीमीटर जाडीची चकती (कॉर्नीया) काढुन ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.

जगातील माणसाचा कॉर्नीया माणसाला बसवीण्याची पहीली शस्त्राक्रीय झेकोस्लोवाकीया मध्ये डॉ. झीरम यांनी ७ डिंसेबर १९०५ ला केला. भारतातील पहीली Corneal Transplant डॉ. धांडा यानी इंदोर येथे केली. जगातील पहीली नेत्र पेढी न्यूर्यार्क येथे १९४४ साली चालू झाली. चेन्नई येथे १९४५ साली पहीली आय बॅक चालू झाली.

नेत्रदानाविषयी समाजात माहीती देवून नेत्रदानास ऊद्द्युक्त करणॆ, नेत्रदान घेणे व त्या डोळ्यांचा उपयोग २ अंधाना नवीन दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी शस्त्रक्रीया करणे या गोष्टी करणारी ना नफा तत्वावर चालवलेली संस्था म्हणजे नेत्रपेढी / आयबॅक.

नेत्रपेढीत मिळालेले डोळे विशिष्ट केमीकलमध्ये साठवून ठेवतात ते ७२ तासापर्यंत उपयोगात आणता येतात. मृत व्यक्तीचे रक्त HIV व Hepatitis testing साठी दिले जाते हे रिपोर्ट Negative आल्यावरच डोळे वापरता येतात.

नेत्रदानीत डोळे कधीही विकले जात नाहीत ते मोफत बसवले जातात. परंतु ऑपरेशनसाठी लागणारी औषधे व हॉस्पिटल खर्च तसेच डोळे Processing साठी येणारा खर्च फक्त नाममात्र रुपात रुग्णांकडून घेतला जातो. नेत्रदानीत डोळे कुणाला बसवले हे गुप्त ठेवले जाते परंतु हे डोळे २ अंधांना दृष्टी देण्यासाठी वापरले गेल्याची माहीती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिली जाते. डोळयामधील काले बुबुळाला विविध कारणानी इजा होते, फुल पडते, पांढरे पडते या बाबतीत नेत्रदानाचा उपयोग होतो. इतर विकारांवर याचा उपयोग होत नाही. 

सन २०११-२०१२ वर्षात भारतात ६०००० कॉर्निया नेत्रदानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते त्या पैकी फक्त ४८०१४ नेत्रदानातुन गोळा झाले. त्यामध्ये तामीळनाडू ८७९६ प्रथम मध्य प्रदेश ६९१४ व्दीतीय तर आंध्रप्रदेश ६८६५ नेत्रदानात तृतीय स्थानाचा आहे. ५१५२ नेत्रदान करत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर व इतर छोटया राज्यात एकही नेत्रदान झालेले नाही. 

एप्रिल-जून २०१२ च्या राष्टीय अंध निवारण अंकात कॉर्निया च्या भारतात अंधत्वाचे प्रमाण २००६-२००७ मध्ये १.१% होते ते आता १.००% इतके झाले असुन अजुनही अनेक विकारानी अंधात्व येत आहे हे नमुद करण्यात आले आहे. आपल्या देशाला एक लाख चाळीस हजार कॉर्निया ची गरज आहे.

श्रीलंका हा देश जगातील ६० देशांना कॉर्नीया दान करतो. आपल्या भारतात सुद्धा ते येतात. श्रीलंका आय डोनेशन सोसायटीच्या माध्यमातुन हे घड्ते तीची स्थापना १९६१ मध्ये देशबंधु डॉ. हडसन सिल्वा यानी केली. सन १९५८ मध्ये त्याना पहीली कॉर्नीयाची जोडी मिळाली.

या मागे बौध्द धर्माची शिकवण. भगवान गौतम बुध्दानी सुखी जीवन जगण्य़ासाठी पंचशील आर्य अष्टांग मार्ग दिला आहे. तसेच दहा पारमिता सांगीतल्या आहेत. या दहा पारमितांपैकी तिसरी पारमिता म्हणजे दान. त्यामध्ये नेत्रदान सुध्दा आले. तेथे अपाघाती मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नेत्र हे देशाची संपत्ती होते. या मुळेच तेथे मोठया प्रमाणात कॉर्नीया जमा होतात.

भारतात मोठया प्रमाणात असलेले गैरसमज कमी नेत्रदानाला करणीभूत आहेत. नेत्रदान केल्यावर चेहरा विद्रुप होतो, पुढल्या जन्मी आंधळेपणा येतो, मृत व्यक्तीची / शरीराची विटंबना होते इत्यादी. परंतू मृत्यू नंतर जे नेत्र आपण अग्नीला अर्पण करणार असतो, ज्याचा आपणाला जराही उपयोग नसतो त्याचा एवढा मोह का ?

वाल्मीकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होते असे सांगीतले आहे.

शैब्य: श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ I

अलर्कश्र्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम II

शैभ्य राजाने बहीरी ससाणा व कबुतरात संघर्ष चालू असताना स्वत:चे मांस ससाण्याला दिले आणि अलर्क राजाने स्वत:चे डोळे दान करुन उत्तम गनीस म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला.

नेत्र दानातुन मिळणारया कॉर्निया बाबतची आकडॆवारी सुद्धा अशीच धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यानीच विधान परिषदेत दिलेल्या माहीती प्रमाणे २०१२-१३ सालात नेत्र दानातुन ५५८७ डोळे (कॉर्निया) जमा झाले. पण त्या पैकी २०३३ नेत्रच (३७%) प्रत्यारोपणासाठी वापरले गेले. १६२२ नेत्र प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरले गेले. तर १९३२ बुबुळे कोणताही वापर न झाल्याने नष्ट करण्यात आली.

एका आधुनीक संशोधनात १ कॉर्निया दोन डोळ्यांना वापरुन दोन्ही डोळ्याना दॄष्टी मिळणे शक्य आहे. या बाबत १२ डोळ्यांवर (कॉर्नीया) संशोधन करुन ते २४ डोळ्याना बसवल्यावर (सर्व २४ डोळ्याना दॄष्टी प्राप्त झाली. याबाबतचा शोध निबंध ३० ऑक्टोबर २०११ ला प्रसीद्ध झाला आहे. याबात अधीक संशोधन होऊन जर प्रत्यक्षात अशा प्रकारे ऑपरेशन शक्य झाली तर एक एक मृत व्यक्ती ४ जिवंत व्यक्तींच्या डोळ्यात प्रकाश देउ शकेल.

नेत्रदान चळ्वळीत आशादायक बातमी म्हणजे माळेगाव हे वाशिम जिल्ह्यातील दिड हजार लोकवस्तीचे एक चिमुकले गाव. जिल्ह्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्श ठरेल. गावात कुणाचा मृत्यू झाला तर नेत्रदान केल्या शिवाय त्याचा अत्यंसंस्कारच होणार नाही असा ठरावच या गावाने केला आहे. याची फलश्रृती म्हणजे तीन वर्षात या गावाने ५२ व्यक्तीचे नेत्रदान घडवून आणले. गावाच्या एकजूटीला व डोळस नेतृत्वाला त्रिवार सलाम. हाच आदर्श, हीच संकल्पना खरतर आपल्या येथे नव्हे भारतभर राबवणे गरजेचे आहे शक्य आहे.

मरावे परी नेत्र रुपी उरावे.