सह्याद्री जेष्ठसेवा (जेष्ठ नागरिक सेवा  )

संपर्क भाऊ काटदरे ९४२३८३१७०० उदय पंडित  ९८८१५७५०३३

सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण या संस्थेच्या वतीने गरजू जेष्ठ नागरिकांसाठी मोफत “सह्याद्री जेष्ठसेवा” योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सध्या चिपळूण शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी बँकेची कामे, पोष्टाची कामे, विविध बिले भरणे, डॉक्टर कडे जाणे, औषध आणून देणे, गॅस नोंदणी, जिन्नस आणणे इत्यादी सर्व प्रकारची कामे केली जातील. ज्या ६० वर्षावरील गरजू जेष्ठ नागरिकांना सदर सेवा हवी असेल त्यांनी व्हॅाट्सअप्प भाऊ काटदरे ९४२३८३१७०० उदय पंडित  ९८८१५७५०३३ व This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ठिकाणी संपर्क साधावा. त्या नंतर संस्थेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जेष्ठ नागरिकांच्या घरी जातील व खरच त्यांना गरज आहे याची खात्री करून घेतील. नंतर त्यांची मोफत नोंदणी केली जाईल व पुढील काळात त्यांना कायमस्वरूपी सर्वप्रकारची सेवा पुरवली जाईल. सदर सेवा ही मोफत असली तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्थेला देणगी द्यावी जेणेकरून हि सेवा उत्तमप्रकारे चालेल. तसेच चिपळूण मधील दानशूर लोकांनी सदर प्रकल्पासाठी देणगी द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर सेवा मोठ्याप्रमाणात करण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांची गरज आहे. निशुल्क सेवा बजावण्याची तयारी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी वरील फोन किंवा ई-मेल वर संपर्क साधावा. कार्यकर्ते नोंदणी अर्ज भरून सदर व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल.

आजच्या कोरोना जागतिक महामारीच्या प्रसंगात या सेवांची गरज अधोरेखित होते. हि संपूर्ण सेवा बजावताना ती पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री केली जाईल. प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते यांना ओळखपत्र दिले जाईल व हे काम करत असताना त्यांच्या गळ्यात सदर ओळखपत्र असेल. सर्व कार्यकर्ते नोंदणीकृत असतील व कोणते कार्यकर्ते कोणत्या जेष्ठ नागरिकाकडे काम करायला गेले याची नोंद संस्थेकडे असेल. सर्व सेवा या लवकरात लवकर पूर्ण होतील असा प्रयत्न असेल काही तांत्रित अडचण नसेल तर दोन दिवसात काम नक्की पूर्ण करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांना थेट संस्थेच्या पदाधीकाऱ्यांजवळ कधीही संपर्क साधता येईल. अशा सेवा पुरवताना अत्याधुनिक वेबसाईट, अॅप, प्रोग्रामिंग इत्यादीचा वापर केला जाईल. सर्व जेष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा सोप्या पद्धतीने व नेमकेपणाने उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.

सह्याद्री निसर्ग मित्र हि चिपळूणमधील आघाडीची सार्वजनिक संस्था असून गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे. निसर्ग संवर्धन, नेत्रदान, देहदान, सेंद्रिय शेती, मधमाश्या पालन, शाळांमध्ये निसर्ग शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी अनेक प्रकल्प यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहेत.

संस्थेच्या वतीने चिपळूणमध्ये हि नवीन सेवा चालू करण्यात येत आहे. त्याचा फायदा गरजू जेष्ट नागरिकांनी घ्यावा तसेच कार्यकर्त्यांनी सदर योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी श्री उदय पंडीत व अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले आहे.